
“जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले,
तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा”
तुकाराम महाराजांनी भक्तीचा खरा अर्थ या उक्तीद्वारे तत्कालीन समाजाला सांगितला. समाजातल्या शोषित आणि दुर्लक्षित घटकाला मायेचा हात द्यावा, त्यांची दुःखें समजून घेऊन त्यांना दुःख निवारणाचा, विकासाचा मार्ग दाखवावा हीच खरी भक्ती आणि आध्यात्मिक प्राप्तीचा मार्ग आहे हेच तुकोबारायांना समाजाला दाखवून द्यायचे होते.. भक्तीच्या या मौसमात तुकाराम महाराजांचा वारसा जपण्यासाठी आणि त्यांची उक्ती ही कृतीत उतरवण्यासाठी स्पंदन फौंडेशन ने आज डहाणू तालुक्यातील वनई गाव गाठले..गावात चंद्रनगर जिल्हा परिषद शाळा आहे. गावातील आदिवासी आणि श्रमिक वर्गातील विद्यार्थी आठवीपर्यंत या शाळेत शिक्षण घेतात. परंतु नववी नंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना तेथून दूर 12 किमीवर वाणगाव येथे जावे लागते. जाण्या येण्याच्या रिक्षा प्रवासासाठी रुपये 24 रोजचे भाडे मुलांना आणि पालकांना परवडत नसल्यामुळेच बरेच मुले आणि लांबची शाळा असल्याने मुलीही घरीच राहत. हीच मुले अर्धवट शाळा सोडून शिकण्याच्या त्यांच्या वयात वाड्या वस्त्यांवर शेतमजुरी साठी जात असत.मुलांचे असे होणारे शैक्षणिक नुकसान फक्त त्यांचे नसून संपूर्ण समाजाचे आणि पर्यायाने देशाचेही आहे हे जाणून घेऊन गावातील निवृत्त लष्करी अधिकारी कृष्णा बसवत यांनी काही समजूतदार ग्रामस्थ, शिक्षक मंडळींना सोबत घेऊन गावातच नववीचा वर्ग भरविला. परंतु वर्गाला शासन मान्यता नसल्याने शासकीय मदती अभावी वर्ग चालवायचा कसा या विवंचनेत ही मंडळी होती आणि विविध ठिकाणी मदती साठी प्रयत्न करत होती. निवृत्त लष्करी अधिकारी कृष्णा बसवत याना स्पंदन फौंडेशन च्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याबद्दल कळले आणि त्यांनी त्वरित संस्थेशी संपर्क साधला आणि त्यांची अडचण सांगितली.टीम स्पंदन ने त्यांच्या शैक्षणिक समस्येचे गांभीर्य ओळखले आणि वनई गावच्या या गरीब मुलांच्या शिक्षणासाठीच्या संघर्षात आपल्या पूर्ण ताकदीने उतरण्याचे ठरविले. मुलांच्या शाळा जून मध्ये सुरू झाल्या होत्या पण जुलै अर्धा सरत आला तरी मुलांकडे अभ्यासासाठी पुस्तके ,वह्या उपलब्ध नव्हत्या. टीम स्पंदन ने आठवड्या भरात ही मदत द्यायचे ठरवले जेणेकरून मुले लगेच अभ्यासाला सुरवात करतील.स्पंदन ने आपल्या देणगीदारांना, हितचिंतकाना आणि मित्रपरिवाराला मदतीसाठी आव्हान केले आणि आठवड्या भरातच मुलासाठी 120 डझन वह्या ,72 नवीन पुस्तकांचा पूर्ण संच आणि भौमितिक साहित्य असे लाखभर रुपयांचे साहित्य जमा केले.आज त्या विद्यार्थ्यांना या सर्व शालेय साहित्याचे सन्मानपूर्वक वाटप करण्यात आले. नवीन वह्या, नवीन पुस्तके आणि साहित्य पाहून मुलांच्या चेहऱ्या वर जबरदस्त आनंद होता. शिक्षकांनाही प्रचंड आनंद झाला होता.स्पंदनच्या प्रत्येक सदस्याला ही मदत मुलांना देताना जणु काही आपण आपल्या लहान भावा बहिणींना ही वह्या पुस्तके देतोय आणि त्यांच्या पुढील आयुष्याच्या वाटचालीत सहभागी होतोय ही भावना होती. आजचा सोहळा खरेच खूप अप्रतिम होता.विठ्ठल दर्शनाला दिंडीत पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या मनात जो भक्तीचा भाव आणि विठ्ठल दर्शनानंतर जी कृतार्थता आणि आत्मिक समाधान असते ते आम्हाला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले.आम्ही सारे तुकारामांचे वारस आहोत याचाही अभिमान वाटला.स्पंदन फौंडेशनच्या ह्या पवित्र कार्यात आमच्या हितचिंतकाचा, देणगीदारांचा आणि मित्रपरिवाराचा अनमोल वाटा आहे. आमच्या आव्हानाला तात्काळ प्रतिसाद देऊन आर्थिक मदत करणाऱ्या तुम्हा सर्वांना मनापासून सलाम आणि लाख लाख धन्यवाद !!!!]

