स्पंदन फाऊंडेशन मुंबई चा चौथा वर्धापनदिन…
मित्रहो चार वर्षांपूर्वी कांदिवली आणि मालाड मधील काही समविचारी आणि संवेदनशील मित्रांनी मिळून समाजातील वंचित आणि गरीब घटकासाठी काम करण्याचा निश्चय घेतला. आजच्या काळात गरीब घटकातील विद्यार्थ्यांच्या समस्या तर प्रचंड गंभीर आहेत. घरची गरिबी, योग्य मार्गदर्शनाचा अभाव, विकृत चंगळवाद आणि आजूबाजूला असलेल्या लबाड धार्मिक आणि राजकीय संघटना या भयंकर विळख्यात आजचा विद्यार्थी सापडला आहे. त्याला योग्य मार्गदर्शन देणे,वेळोवेळी आर्थिक मदत देणे, त्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षण आणि त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन देणे, अनाथाश्रम ,आदिवासी व गरीब वस्त्या याठिकाणी जिथे जिथे शालेय विद्यार्थी अडचणीत आहेत तिथे गेल्या चार वर्षात स्पंदन ने आपल्या मदतीच्या जोरावर विद्यार्थ्यांच्या जीवनात आनंद फुलवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.तुम्हा सहकारी मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या सातत्यपूर्ण आर्थिक सहकार्यामुळे आम्ही गेली चार वर्षे सतत काम करत आहोत. आमच्या फेसबुक पेजवरही तुम्ही आमच्या कामाचे स्वरूप पाहतच आहात.स्पंदन फाऊंडेशन ने आपला चौथा वर्धापनदिन सुद्धा विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी साजरा करावा असे ठरवले. त्याकरिता आम्ही राज्यस्तरीय आंतरशालेय समूहगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत मुंबई,ठाणे आणि डोंबिवली मधील अनेक शाळांनी सहभाग दर्शविला. प्रचंड उत्साहात आणि जोशात मुलांनी अनेक प्रबोधनपर स्फूर्तीगिते गायली. मुलांचा जल्लोष आणि तयारी पाहता सदर स्पर्धेचा निकालही प्रचंड उत्कंठावर्धक होता.स्पंदन फाऊंडेशन ने विद्यार्थ्यांना आणि शाळांना खूप प्रोत्साहन मिळावे म्हणून बक्षिसांची रक्कम आणि चषक सुद्धा अतिशय भव्य ठेवले होते. तुम्हा सर्व मित्रांना स्पर्धेचा निकाल कळावा आणि तुम्हालाही विद्यार्थ्यांच्या सांगीतिक कौशल्याची माहिती व्हावी म्हणुन आम्ही प्रथम तीन क्रमांकाचे व्हिडिओज इथे पेजवर अपलोड करत आहोत.स्पंदन च्या ह्या वर्धापदिनानिमित्त तुमचा विश्वास , स्नेह आणि सहकार्य आम्हाला वर्षानुवर्षे आम्हाला प्रेरणा देत राहील आणि आम्ही अधिकाधिक समाजात आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवत राहू या नम्र अपेक्षेसह धन्यवाद.

