मित्रहो,
मागील जून महिन्यात आपण सर्वजण कोरोनाच्या महामारीशी लढत असताना आपल्या महाराष्ट्रातील रायगड, कोकण पट्ट्यात निसर्ग चक्रीवादळाने प्रचंड हाहाकार केला. महाड, दापोली , अलिबाग या सारख्या अनेक जिल्ह्यात या चक्रीवादळाने अनेक संसार उध्वस्त केले. अनेक घरांचे प्रचंड नुकसान झाले. या भागातील नागरिक कोरोनाने आणि चक्रीवादळाने केलेल्या नुकसानीचे प्रचंड हतबल झाले होते.

टीम स्पंदन नेहमीच अशा अस्मानी किंवा सुलतानी संकटांशी संघर्ष करणाऱ्या आपल्या बहीण भावंडाना मदत करण्यास तत्पर असते. टीम स्पंदन ची धडाडीची कार्यकर्ती आणि युवा पत्रकार यामिनी दळवी हिने फेसबुकवर कोकण वासियांसाठी मदतीची हाक दिली आणि अनेक आमच्या मित्रांनी खुल्या दिलाने तिच्या हाकेला प्रतिसाद देऊन पीडित नागरिकांसाठी मदत देऊ केली. दुर्दैवाने कोरोनाचा कहर सतत वाढत असल्यामुळे तेथे जाऊन मदत करणे अशक्य झाले होते. तेव्हा लोकांमध्ये जाऊन लोकांसाठी पत्रकारिता करणारे आमचे पत्रकार मित्र संतोष टाकळे यांनी स्वतः पुढाकार घेऊन दापोली तालुक्यात लोकांना घरोघरी जाऊन मदत दिली.
सदर मदतीने गावाची हानी भरून येणे शक्य नाही परंतु हा स्पंदन परिवाराने आपल्या अडचणीत असणाऱ्या बहीण भावंडाना दिलेला तात्पुरता आधार आहे. आपणही शक्य असल्यास सदर गावांना आपली मदत देऊ शकता.
सध्याच्या आर्थिक अडचणीच्या काळात ही मदत करणाऱ्या आमच्या मित्रांचे, स्वतः पुढाकार घेऊन मदतीची हाक देणाऱ्या आमच्या यामिनी दळवीचे आणि ही मदत स्वतः जाऊन योग्य हातांमध्ये पोहोचवण्याच मोठे काम करणाऱ्या पत्रकार मित्र संतोष टाकळे यांचे स्पंदन परिवार ऋणी आहे.

