प्रिय मित्रहो,
आम्ही फेब्रुवारी महिन्यात पालघर जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील एका निवृत्त सैन्य अधिकाऱ्याने सुरू केलेल्या शाळेतील विद्यार्थ्यासाठी पुस्तके, वह्या आणि गणवेशासाठी आमच्या काही मित्रांना मदतीसाठी आवाहन केले होते. दुर्गम आणि ग्रामीण भागातील अशा काही शाळा टीम स्पंदन ने दत्तक घेऊन त्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक मदत देऊन सक्षम करण्याचे कार्य टीम स्पंदन सातत्याने करत आहे. आमच्या या शैक्षणिक कामासाठी आमचे हितचिंतक आणि दिलदार मित्र आम्हाला सतत मदत करत असतात.
या विद्यार्थ्यासाठी देखील आमच्या या दानशूर मित्रांनी फक्त 9 दिवसात एकूण 2.4 लाखाची मदत केली होती. दुर्दैवाने त्यानंतर काही दिवसातच आपण सर्व एका जागतिक महामारीला सामोरे गेलो. त्यामुळे आम्हाला आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्रांना सुरक्षेच्या कारणास्तव मदत करता येत नव्हती.
परंतु त्या विद्यार्थी मित्रांचे अधिक नुकसान होऊ नये आणि त्यांना अभ्यासाला सुरुवात करता यावी म्हणून टीम स्पंदन च्या आमच्या सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन मुलांना पुस्तके दिली. आम्ही शाळेकडे विद्यार्थ्यांचे गणवेश देखील जमा केले आहेत. शाळा व्यवस्थित सुरू झाल्यावर त्यांना वह्या आणि गणवेश देखील देण्यात येतील. कोरोनाच्या काळात आपले ग्रामीण आणि आदिवासी विद्यार्थी बांधव शैक्षिणक प्रवाहापासून दूर जाऊ नये म्हणून आमच्या ज्या मित्रांनी पुढाकार घेऊन हे कार्य केले त्यांचा आम्हाला अभिमान आहे. ज्या आमच्या दिलदार मित्रांनी आमच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देऊन त्वरित आर्थिक मदत केली त्यांच्या समाजा बद्दल आणि देशाबद्दल असलेल्या निष्ठेला आमचा सलाम.
आपण सर्व या जागतिक महामारीचा अधिक सजगपणे आणि सुरक्षितरित्या मुकाबला करूया. दुर्बलांना आधार देऊया.




