Guidance lecture at Hemalkasa

एका व्याख्यानाची गोष्ट …

स्पंदन फाऊंडेशन मुंबई आयोजित दहावी मार्गदर्शन शिबिरासाठी दिनांक 29 डिसेंबरला मी, सचिन ठाकूर सर आणि रविंद्रनाथ कामथ सर मुंबईहून हेमलकसाला जायला निघालो. आम्ही 30 डिसेंबरला सकाळी 7.30 वा. नागपूरला पोहोचलो. पुढे तब्बल सात / साडेसात तासांचा प्रवास करून आम्ही दुपारी 3.00 वाजता हेमलकसा येथे पोहोचलो. प्रवासाचा थकवा जाणवत होता कारण तब्बल 22 तासांचा प्रवास करून आम्ही तिथे पोहोचलो होतो. तरीही 4.00 वा. सचिन ठाकूर सरांनी विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला आम्हाला वाटले होते की विद्यार्थ्यांची आकलन क्षमता कमी असेल. परंतू विद्यार्थ्यांनी आम्हाला खोटं ठरवलं कारण त्यांची आकलन शक्ती वाखाणण्याजोगी होती. पहिल्या दिवशी रात्री लेक्चर संपल्यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना थोडीशी अडचण येत होती कारण मराठीतील काही शब्द त्यांना कळत नव्हते आणि त्यांचे माडीया गोंड भाषेतील शब्द आम्हाला कळत नव्हते. रात्रीचं जेवण झाल्यावर आम्ही शतपावली करण्यासाठी गेलो असता पाहिलं की सर्व विद्यार्थी रात्री 8.00 ते 10.00 स्वयं अध्ययनासाठी आलेले होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी 7.30 वा. लेक्चर्सला सुरुवात झाली. या दिवशी भामरागड येथून आणखी तीन शाळांचे विद्यार्थी मार्गदर्शन शिबिरासाठी आले होते. लोकबिरादरी माध्यामिक आश्रमशाळा, हेमलकसा या शाळेतील विद्यार्थ्यांचा एक वर्ग आणि इतर शाळांचा दुसरा वर्ग असे दोन वर्ग केले. एवढी विद्यार्थी संख्या असूनही वर्गात टाचणी पडली तरी तिचा आवाज येईल इतकी शांतता. दोन तासिकांच्या मधे थोडा वेळ मिळायचा त्यात विद्यार्थी आम्हाला माडिया गोंड या आदिवासी भाषांमधील शब्द शिकवायचे उदा. गट्टो, पिल्ला, पेकूर, अत्ता, अय्यो इ. शब्द आम्ही आत्मसात केले. सकाळी 7.30 ते संध्याकाळी 6.45 पर्यंत आम्ही लेक्चर्स घेत होतो. संध्याकाळी 7.00 वा मुलांची जेवणाची वेळ असते. जेवण झाल्यानंतर पुन्हा विद्यार्थी रात्री 8.00 ते 10.00 या वेळेत स्वयंः अध्ययनासाठी शाळेत हजर होते. आजच्या दिवसातील खास वैशिष्ट्य म्हणजे सचिन सरांनी विचारलेल्या एका कठिण प्रश्नाचे उत्तर जे शहरातील विदयार्थ्यानाही कधी जमले नाही त्या प्रश्नाचे उत्तर या शाळेतील एका विद्यार्थ्यांने दिले. सरांनी त्याला त्यांचे आवडते पेन बक्षीस म्हणून दिले.

तिसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी 7.30 वा लेक्चर्सना सुरुवात झाली. आजही भामरागड येथील वेग वेगळ्या शाळांमधील विद्यार्थी मार्गदर्शन शिबीराला आले होते. दुसऱ्या दिवसाप्रमाणे आजचा दिवस निघून गेला. दिवसाला 11 ते 12 तास लेक्चर्स आम्ही घेत होतो. आज विद्यार्थ्यांना सांगितले की उद्याचा दिवस हा व्याख्यानाचा शेवटचा दिवस आहे आणि इथेच तीन दिवस अनुभवलेल्या आनंदावर विरजण पडले. विद्यार्थ्यांचे चेहरे उतरले. ते आग्रह करू लागले ‘ सर, आणखी काही दिवस थांबा .’ आम्ही त्यांची कशीबशी समजूत काढून तिथून निघालो.

चौथ्या दिवशी वर्गात गेल्यावर जाणवत होतं विद्यार्थी फारच निराश झालेले होते. सर्व लेक्चर्स संपल्यावर विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी वर्गात गेलो आणि विद्यार्थ्यांचे चेहरे पाहून आमच्या डोळ्यांच्या कडाही ओल्या झाल्या. एखादं लहान मुल आईला कुठेही जाऊ नको म्हणून गयावया करतात तशीच आम्ही मुंबईला जाऊ नये म्हणून ते विनंती करीत होते. बऱ्याच जणांचे डोळे पाणावले होते.निघण्याची वेळ आली तेंव्हा तीन विद्यार्थी आमच्यासाठी भेटवस्तू घेऊन आले. नेहमीप्रमाणे आम्ही कुणाकडूही भेटवस्तू घेत नाही असं म्हंटल्यावर जर भेटवस्तू घेतली नाही तर आम्ही जेवणारच नाही अशी प्रेमळ धमकीच दिली. नाईलाजास्तव त्या भेटवस्तू आम्ही स्विकारल्या आणि दहावीच्या परीक्षेत जे पहिले तीन विद्यार्थी येतील त्यांना त्या देण्यासाठी मुख्याध्यापक सरांकडे सुपुर्द केल्या. निघताना आम्हाला पुन्हा भेटून जा अशी विद्यार्थ्यांची प्रेमळ विनंती मान्य केली परंतू प्रत्यक्षात हेमलकसा सोडताना आम्ही शाळेकडे गेलोच नाही कारण विद्यार्थी पुन्हा भावनिक झाले असते.

सर्व जग 31 डिसेंबर आणि नवीन वर्षाचं स्वागत विविध पद्धतीने करीत असताना स्पंदन फाउंडेशनच्या टीमने नवीन वर्षाचे स्वागत मात्र आपल्या उद्दिष्टांना साजेशा अशा अभिनव पद्धतीने केले. या चार दिवसात आणि विशेषतः नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच असंख्य विद्यार्थ्यांच्या प्रेमाची शिदोरी घेऊन आम्ही आमच्या पुढील वाटचालीसाठी सुरुवात केली.

  • प्रमोद मोहिते
    स्पंदन फाऊंडेशन मुंबई

Leave a Reply

Translate

Discover more from Spandan Foundation, Mumbai

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading